२०१७ च्या निवडणुकीत जयश्री मारणे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. २०१२ च्या निवडणुकीमध्ये कोथरूड भागातून जयश्री मारणे या मनसेमधून निवडून आल्या होत्या.त्यानंतर झालेल्या २०१७ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
आता महापालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहीले असताना, जयश्री मारणे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत आज(बुधवार) राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. तर, जयश्री मारणे या पुण्यातील गुंड गजानन मारणेच्या पत्नी असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
गजानन मारणे हा तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पुण्यापर्यंत जवळपास ३०० चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली होती. या रॅलीची चर्चा राज्यभरात सुरू होती. त्याच दरम्यान विविध कलमा अंतर्गत गजानन मारणेवर गुन्हे दाखल करून, त्याला अटक देखील करण्यात आली होती. त्या एकूणच प्रकरणी एक वर्षाकरिता त्याला स्थानबद्ध करण्यात आले. आता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.