pradeep apte article on the godfather 50th anniversary zws 70 | एक इटालियन उजळणी.. ‘गॉडफादर’च्या निमित्ते!


‘गॉडफादर’ चित्रपटातील गुन्हेगारी पद्धती इटलीतून जन्माला आली आणि मग जगभर सर्वत्र तिचा फैलाव झाला. कसा, ते सांगणारा लेख..

प्रदीप आपटे [email protected]

‘गॉडफादर’ चित्रपटातील गुन्हेगारी पद्धती इटलीतून जन्माला आली आणि मग जगभर सर्वत्र तिचा फैलाव झाला. कसा, ते सांगणारा लेख..

नैसर्गिक साधनसामुग्री, तंत्रज्ञान आणि उपजीविकेतील श्रमविभागणी ही समाजाची प्रस्थानत्रयी! त्यातला एक भिडू बदलला की इतरही कात टाकायला लागतात. संपत्तीचे, ऐश्वर्याचे रूप, आकार वाढत असतात आणि बदलतात. त्याच्या वळचणीला राहणारे आणि वाढणारे बळजबरी आणि फसवणुकीच्या अपराधांचे रूपदेखील पालटते. मग ते कितीही अश्लाघ्य वाटो, कितीही भयावह भासो.. तरीही अपराध हा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून जारी राहतो. अपराधाचे निर्मूलन करणेही जशास तसे म्हणावे इतके भयंकर असते. ते करण्याची धुरा कुणी वाहावी? ज्यांना झळ पोहोचते त्यांनी. विशेषकरून सधनांनी- आणि त्यातल्या त्यात राजसत्तांनी. पण यातून निपजते ते भलतेच! ते म्हणजे धनिक आणि राज्यकर्त्यांचे या गुन्हेगारी विश्वाशी दुहेरी व दुतोंडी वैर आणि सख्य! परिस्थितीनुसार साहाय्य वा सख्य; आणि बाजी पालटली की वैर!

परिणाम काय? तर त्या, त्या समाजाच्या मगदुरानुसार, समृद्धीच्या पायरीनुसार अपराध हा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून जारी राहतो. बळजबरी आणि फसवणूक हे गुन्ह्यंचे दोन मूळ स्रोत आणि प्रकार. बदलत्या आर्थिक घडीबरोबर त्यांच्या छोटय़ा-मोठय़ा अवतारांना निराळा बहर येतो. इतिहासात समाजाच्या या घडणीला किंवा ठेवणीला जगात कुठेच अपवाद सापडत नाही. जगभरच्या साहित्यात आणि आता सिनेमात या अपराधाभोवती गुंफलेल्या कथांचे छोटे-मोठे पेव आढळते. कुरोसावाचे ‘सेव्हन सामुराई’ डाकूंच्या धाडीपासून बचाव करायला गावकऱ्यांना उभे करतात. (‘सेव्हन मॅग्निफिसंट मेन’ हा त्याचा हॉलीवूड अवतार. आणि आणखी बाष्कळ हिंदी आवृत्ती- ‘चायना गेट’!) कुरोसावाचाच दुसरा गाजलेला चित्रपट ‘हाय अ‍ॅण्ड लो’! श्रीमंत उद्योगपतीच्या लहान मुलाचे खंडणीसाठी अपहरण होते. पण चुकीने अपहरण होते ते उद्योगपतीच्या मुलाऐवजी मुलाच्या मित्राचे. आणि तो मुलगा त्याच्या नोकराचा मुलगा निघतो! हे कळताच ‘खंडणी-सौद्या’चा नूर पालटतो, नैतिकता बदलते, भाषा बदलते! (हिंदी अवतार : ‘इन्कार’!)

ही जगभरची सार्वत्रिकता तर खरीच; पण ‘हर गार्डाची न्यारी शिट्टी, हर गार्डाचा न्यारा अवतार’ हे इथेही लागू आहेच. गुन्हेगारी ठेवणीला त्या, त्या काळाचा, संस्कृतीचा निराळा वास असणारच. पण कधी कधी त्या खासियतींच्या वासांपेक्षा ‘अधिवास’ लौकिक कमावतो! गाण्यातल्याप्रमाणे गुन्हे-अपराधांची ठिकठिकाणची घराणी आहेत. आणि त्यात सर्वाधिक ख्याती कुणाला? तर इटालीला! त्याहून विशेष म्हणजे या इटाली घराण्याची ‘शैलीदार पायंडा पाडणारे’ अशी ख्याती झालेली आहे. याची तीन लख्ख उदाहरणे बघू- म्हणजे ‘इटाली घराण्या’ची गुन्हेगारी पायंडा घडविणारी प्रतिभा ध्यानात येईल!

हेही वाचा :  पुण्यातील ऑटोरिक्षा चालकाची खास ऑफर, ‘The Kerala Story’ चित्रपट पाहणाऱ्या महिलांना...

‘गॉडफादर’ आणि तत्सम चित्रपटांत दिसणारे गुन्हेगारी जग उपजले ते सिसिलिअन बेटात. तिथल्या जमीनदार वर्गाला परकीय सत्ताधीशांच्या लुटीला तोंड देण्यासाठी रक्षक सेना हवी होती. ताकद आणि धाडस असलेल्या रक्षक कुटुंबांची उभारणी त्यातून झाली. कालांतराने परकीय राजवट मावळली; पण तयार केलेला रक्षक भस्मासूर मावळला नाही! त्यांना जरब बसवत त्यांची हकालपट्टी आणि मुस्कटदाबी सुरू झाली. त्यातले काही अमेरिकेकडे परागंदा झाले. त्याच प्रकारचा संरक्षण आणि जरबदारी धंदा अन्य व्यवसायांना त्यांनी लागू केला! अगोदरच्या हाच व्यवसाय करणाऱ्या आयरिश किंवा ज्यू टोळ्यांना त्यांनी स्पर्धेतून बाद केले. तिथे त्यांनी आपले मूळ कसब, जरब बसवण्याची तंत्रे, जीवघेण्या हाणामाऱ्या पाजळल्याच; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कुटुंबांची आणि संघटनेची गुप्तता पाळणे, परस्पर विश्वासघात न करण्याची शपथ घेणे आणि ती पाळण्याची रूढी कायम ठेवली. शपथपूर्वक मौन बाळगणे, कुटुंब आणि संघटनेची शिस्त, मर्यादा पाळणे, ती मोडल्यास ‘प्राणहानी’ पत्करणे इत्यादीसारखे त्यांचे दंडक आजही सव्वाशे वर्षे जारी आहेत! अमेरिकेत, दक्षिण अमेरिकेत आणि युरोपातदेखील! बदलले ते जमीनदारांप्रमाणेच संरक्षण मागणारे नवनवे व्यापार आणि उद्योग! उदा. अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे यांचा व्यापार सुखाने करणे, वेगवेगळ्या बडय़ा धेंडांकडून संरक्षण शुल्क उकळायचे, नाहीतर त्यांना ब्लॅकमेल करून खंडणी मागायची! या व्यवहाराला वेसण घालू बघणाऱ्या राजकारणी पुढाऱ्यांना एकतर वश करून आपल्यात सामील करून घ्यायचे किंवा मग धमकावणीने मुकाट बनवायचे; नाहीतर स्वर्गलोकी धाडायचे! या पायंडय़ाचा आदर्श घालून दिला तो इटालिअन माफियाने! आता जगभर या धर्तीचे देशोदेशी विविध पाईक आहेत! फार काय, ‘माफिया’ आणि ‘डॉन’ ही रूढ बिरुदेदेखील इटालिअन भाषेतली! इटालीमध्ये गेल्या चार दशकांत अनेक राजकीय हत्या, भ्रष्टाचारांची प्रकरणे झाली. त्यांत सामील असल्याने शिक्षा झालेले अनेक राजकीय पुढारी आणि बँकर्स आहेत. त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आणि कारावास भोगावा लागला. त्यांच्या उच्चाटनासाठी चळवळ करणाऱ्या अनेक संघटना आहेत. तरीही एका अंदाजानुसार, इटालीच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी दहा ते १२ टक्के हिस्सा हा या माफियांच्या तावडीतील संबंधित व्यवसायांचा आहे. सिसिलीमध्ये हे प्रमाण आणखी जास्त आहे.

दुसरा मासला पोन्झीचा. हा पठ्ठय़ा छोटी-मोठी फसवणूक, ठगगिरी करीत असे. पण तो पकडला गेला. मग तो इटालीतून अमेरिकेत आला. त्याच्या लक्षात आले की झटपट श्रीमंत होण्याची लालसा अवतीभवतीच्या खूप जणांना आहे. रोजगार आणि ऐश्वर्याच्या आशेने अमेरिकेत येऊन धडकलेले अनेक इटालियन गरीब कामगार होते. होतकरू मध्यमवर्गीय होते. त्यांना साद आणि भुरळ घातली की ते अविचारीपणे भरपूर पैसे देतील. खरे तर पोन्झीच्या अगोदर सारा डोव्ह नावाच्या एका वृद्ध स्त्रीने हा खेळ बॉस्टनमध्ये केला होता. पण त्या खेळाला पॉन्झीइतके अक्राळविक्राळ रूप आणि हिकमतींचा सांगाडा नव्हता. पोन्झीने वर्षांत ५० टक्के वाढीचा भरवसा देत ठेवी गोळा करायला सुरुवात केली. यातले एक सोपे तत्त्व होते : ‘अ’कडून पैसे घ्यायचे. ते फेडायला ‘ब’कडून पैसे घ्यायचे. ‘ब’चे पैसे फेडायला ‘क’कडून घ्यायचे. पण खरे आव्हान होते ते वाढीव परताव्याच्या दराने फेडण्याचे! म्हणजे ‘अ’ची १०० रुपयांची परतफेड करायला ‘ब’कडून १५० उकळले पाहिजेत. ‘ब’ची परतफेड करायला ‘क’कडून २२५ उचलले पाहिजेत. मग आणखी जास्त लोक जाळ्यात ओढायचे आणि त्यांच्याकडून आलेली रक्कम अगोदरच्या ठेवीदारांना ५० टक्के परतावा दिल्यागत देऊन टाकायची. पण हे मारुतीचे शेपूट गळ्याभोवती साचत साचत कधी ना कधी गळ्याचा तात बनणारच. या ५० टक्के परताव्यामागे काही काळेबेरे आहे याची कुणकुण पसरली होती. त्याच्या ‘श्रीमंत व्हा’ योजनेला भुलून इतर बँकांचे ठेवीदार गुल होऊ लागले होते. एकाचे वाढीव पैसे देण्यासाठी दुसरा बकरा, दुसऱ्याचे देण्यासाठी आणखी मोठा खुळा बकरा अशी ही बनवाबनवी होती. त्याच्याविरुद्ध तक्रारी झाल्या. बातम्या आल्या. पण पोन्झीने अनेक पोलीस आणि सरकारी अधिकारी आपल्या या ‘योजने’त खिळवून ठेवले होते. त्यांची तो बडदास्त ठेवायचाच; पण त्यांचा परतावाही चोख द्यायचा. अखेरीस हा फुगा फुगत फुगत फाटला. िबग फुटले. पोन्झी तुरुंगात गेला. पण त्याची युक्ती आणि क्लृप्ती त्याच्या नावाने अमर राहिली. पॉन्झीने पाडलेला पायंडा, हिकमत आणि करामत कधीच मावळली नाही. ती आजही जगभर ठिकठिकाणी जारी आहे!

हेही वाचा :  आकाशात दिसणार अद्भूत नजारा! दोन सूपरमून आणि... ऑगस्ट महिन्यात खगोलीय घटनांची पर्वणी

खुद्द अमेरिकेत २००८ साली बर्नी मॅडॉफ नावाच्या गुंतवणूक दलालाचे प्रकरण उघडकीला आले. मॅडॉफ श्रीमंतांना भुरळ पाडून पॉन्झी तत्त्वानेच वित्तीय संपदा वाढती ठेवत होता. त्याच्याविरुद्ध अनेकदा तक्रारी झाल्या. सिक्युरिटी एक्स्चेंज नियंत्रकांनी कितीदा तरी धाडी घातल्या. पण काहीच गैर सापडेना! कसे सापडणार? सगळाच खोटा मामला! पुढच्याची वाढीव रक्कम नव्या मोठय़ा बकऱ्यांतून भागवायची. गुंतवणूक आणि परताव्याचे खोटे आकडे छापलेले पत्रक त्यांना धाडत राहायचे. त्या पत्रकाने सुखावलेले बरेच जण पैसे काढून घ्यायच्या ऐवजी पुन्हा पुढे गुंतवायला तयार व्हायचे! म्हणजे प्रत्यक्ष रोख परतफेडीचा रेटादेखील निवळायचा! जेव्हा मॅडॉफच्या अनेक धनिक धनकोंना हे िबग कळले तेव्हा काही जण हृदयविकाराने मरण पावले, काहींनी आत्महत्या केल्या. ही मनगढंत काल्पनिक ताळेबंद, नफापत्रक लिहिण्याची कला सत्यम कॉम्प्युटर्सच्या श्री. राजू यांनी नाही का भारतात अवलंबिली? एवढेच काय, काही छोटे कंगाल देश आहेत. त्यांची अतोनात कर्जे उचलणारी सरकारे आहेत. ‘सरकारी कर्ज कधीच बुडीत नसते’ अशा गोड समजावर त्यांना अन्य देश आणि तेथील बँका कर्ज देतात. नव्वदच्या दशकात तेलाच्या नफ्यावर आणि चलनाच्या वाढीव मूल्यावर फुगलेले बँकांचे कर्ज सरकारी तिजोरीखातर गेले आणि फुगले. परतफेडीसाठी आणखी फुगले. आणि हा बेताल कर्जफुगवटय़ाचा फुगा मग फुटला! ज्या देशांची सरकारे ‘सरकारी कर्ज बुडत नाही’ या श्रद्धेवर वाढीव उचल घेत राहतात ती खरे तर पॉन्झीचीच वाकडी वाट चोखाळत असतात. असा हा इटालीयन पॉन्झीकृत पायंडाही इटालीच्या नावे अजरामर झाला आहे.

हेही वाचा :  एनसीबीची मोठी कारवाई; 10 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या रशियन ड्रग्ज तस्करांना अटक

यात आणखी एक खासियत आहे. त्यावर चित्रपट निघण्याची शक्यता दुर्मीळच आहे. या बळजबरी आणि वित्तीय गुन्हेगारीत बरबटलेली आणखी एक संस्था आहे. ती म्हणजे रोमच्या पोटात वसलेले ‘व्हॅटिकन’ नावाच्या देशाचे सरकार! या सरकारचे प्रमुख आहेत पोप! आपली मालमत्ता सुखोपभोग आणि ख्रिस्ती धर्म प्रचारार्थ वापरणे, जगभरच्या राजकारणात लुडबुड करणे, त्यासाठीचा पैसा व्हॅटिकन बँकेमार्फत साठविणे व पसरविणे या उद्योगांत गढलेली ही व्हॅटिकन बँक! मृत ज्यूंची संपत्ती हडप करणे, मृतांचे दागिने, अंगठय़ा आणि सोने बळकावणे इत्यादी या बँकेचे काळे उद्योग सर्वख्यात आहेत. पण त्याला सहजी वाचा फुटली नाही. १९८२ साली कार्लो काल्वी या व्हॅटिकन बँकेच्या फरार प्रमुखाच्या संशयित मृत्यूमुळे या प्रकरणाला वाचा फुटली. त्यातून व्हॅटिकन बँकेच्या बदलौकिकाला तोंड फुटले. या प्रकरणातून अनेक वित्तीय भानगडी, दुराचार, हिंसक परिणाम उघडकीला आले. व्हॅटिकन हे स्वतंत्र राष्ट्र आहे. प्रतिष्ठित धार्मिक सत्ता आहे. या बँकेला उपहासाने ‘देवाची पतपेढी’ (गॉडस् बँक) असे संबोधले जाते. तीदेखील या गुन्हेगारी पायंडय़ाची एक शाखा आहे! गुन्हेगारीचे असे कितीतरी पैलू आहेत.. त्यांची आठवण झाली ती ‘गॉडफादर’च्या पन्नाशीमुळे!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …