पावनखिंड… हा सिनेमा आपण फक्त सिनेमा म्हणून पाहूच शकत नाही. कारण तो आपला अभिमान आहे. बांदलवीरांच्या शौर्याची त्यांच्या सर्वोच्च बलिदानाची ती गाथा आहे. आणि ही गाथा तेवढ्याच ताकदीनं आणि हिंमतीनं पडद्यावर साकारण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे.

फर्जंद सिनेमाच्या आधीच्या शिवकालीन युद्धपटांबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला थेट 40 वर्षें मागे जावं लागतं. भालजींनी हे शिवधनुष्य पेललं होतं आणि त्यानंतर आता दिग्पाल लांजेकरचं हे शिवअष्टक. मध्ये अगदी काही अपवाद.

छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांचा पराक्रम, मावळ्यांनी गाजवलेलं अतुलनीय शौर्य हे पडद्यावर मांडणं खरंच सोपं नाही. त्यातही मराठी सिनेमा करायचं म्हंटलं तर आणखी कठीण कारण अर्थातच त्यासाठी लागणारं बजेट. ऐतिहासिक सिनेमांचा कॅन्व्हास प्रचंड मोठा असतो. त्याला आपल्या बजेटच्या चौकटीत बसवणं महाकठीण काम, दिग्पालने मात्र त्याच्या ‘फर्जंद’ या पहिल्या सिनेमापासून हे महाकठीण काम आवाक्यात आणलं आणि चौकट इतक्या सुंदर रितीने सजवली की पाहाणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहावेत.

‘पावनखिंड’ सिनेमाही त्याला अपवाद नाही. अगदी पहिल्या मिनिटापासून ते क्लायमॅक्सपर्यंत हा सिनेमा आपल्याला खिळवून ठेवतो. अर्थात काही ठिकाणी पकड काहीशी ढिली होते मात्र त्यामागे कारणं आहेत. पावनखिंड म्हटल्यावर दिग्दर्शक फक्त बाजीप्रभुंची गोष्ट सांगत नाही तर या लढाईत आपलं योगदान देणाऱ्या कित्येक अज्ञात वीरांना आपल्या समोर आणतो.

युद्धपट आहे म्हणून दिग्दर्शक फक्त रणांगणावर लढणारे योद्धे दाखवत नाही तर त्या प्रत्येकाच्या रक्ताचं कुणीतरी घरी वाट पाहातं आहे त्यांच्या जीवाची काय घालमेल झाली असेल, होत असेल हे ही तो आपल्यासमोर मांडतो. आणि म्हणूनच हा समांतर प्रवास दाखवत असताना आपली तंद्री काही क्षणासाठी भंग जरी झाली तरी ते माफ आहे.

पावनखिंडची लढाई किंवा ती गोष्ट आपल्या सर्वांना माहित आहेच. पण हा सिनेमा तेवढ्यापुरता मर्यादित नाही. थेट छत्रपतींच्या कथनातून उलगडत जाणारा हा सिनेमा म्हणजे भावनांचा प्रवास आहे. यात मानवी भावभावनांचा प्रत्येक रंग आहे.

युद्धपट असला तरी ही बलिदानाची गाथा आहे. आपल्या जीवासाठी स्वत:च्या जीवावर उदार झालेले मावळे पाहून व्याकूळ होणारे छत्रपती, त्यांचं आपल्या सहकाऱ्यासाठी तुटणारं काळीज, ती वेदना सारंच आपल्याही डोळ्यात पाणी उभं करतं.

या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे ती संहितेच्या पातळीवर असलेलं डिटेलिंग. तो काळ, ती माणसं, ती लढाई, त्या लढाईच्या संदर्भातली प्रत्येक बारीक बारीक गोष्ट सगळंच खूप छान पद्धतीनं आपल्या समोर येतं. एखादी मोहिम जर फत्ते करायची असेल तर काय आणि किती पातळ्यांवर काम करायला हवं आणि तेव्हा कसं काम केलं गेलं ते हा सिनेमा सप्रमाण मांडतो. तांत्रिक किंवा आर्थिक मर्यादेमुळे त्या गोष्टी पडद्यावर सोप्या भासत असल्या तरी आपल्याला त्या ताणाची जाणीव हा सिनेमा करुन देतो. म्हणजे पन्हाळ्याच्या खाली इंग्रजांनी आणणेल्या तोफा बहिऱ्या करण्यासाठी मावळ्यांनी केलेला हल्ला असेल किंवा मग विशाळगडाच्या पायथ्याला दबा धरुन बसलेल्या शत्रूंशी केलेला सामना. या लढाया सिनेमात तेवढ्या प्रभावशाली वाटत नसल्या तरी दिग्दर्शक आपल्याला त्या काळाच्या, त्या ताणाच्या, त्या परिस्थितीच्या अगदी जवळ घेऊन जाण्यात कमालीचा यशस्वी ठरला आहे.

लढायांच्या बाबतीतच बोलायचं झालं तर मुख्य लढाई मात्र आपल्याला अक्षरश: खिळवून ठेवते. त्यासाठी वापरलेली शस्त्रं, युद्धनिती, मुख्य म्हणजे त्या दृश्यांमधली सगळी लोकेशन्स आणि तंत्रज्ञानाचा वापर सारंच कमाल आहे आणि बांदल सेनेच्या भूमिकेत असलेल्या प्रत्येकाने तर अक्षरश: कळस चढवला आहे.

यातल्या प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलंय. चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, हरीश दुधाडे, विक्रम गायकवाड, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, माधवी निमकर, वैभव मांगले, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे यादी खूप मोठी आहे. यातला प्रत्येकजण कमाल आहे. त्या साऱ्यांच्या प्रचंड मेहनतीतून हे युद्धपट साकारला गेलाय. आणि ती मेहनत पडद्यावर दिसते.

बाजीप्रभूंच्या भूमिकेतले अजय पूरकर पन्हाळ्यावर जो बाजींचा पुतळा आहे ती पोज घेऊन जेव्हा उभे राहातात तेव्हा शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याला नजरेनं जाळण्याची धमक त्यांच्या डोळ्यात दिसते. त्यांनी केलेला प्रत्येक सीन आपल्या थेट बाजीप्रभूंशी एकरुप करतो.

या सिनेमात गाण्यांचा वापरही अगदी प्रभावीपणे केला आहे. ती गाणी कथेचा भाग बनून येतील याची व्यवस्थित काळजी घेतली आहे. युगत मांडली हे गाणं, गाणं म्हणून तर उत्तम झालं आहेच पण ते ज्या पद्धतीने, ज्यावेळी येतं त्यासाठी दिग्पालला पैकीच्या पैकी मार्क्स.

थोडक्यात बाजीप्रभूंच्या, बांदलसेनेच्या शौर्याची त्यांच्या सर्वोच्च बलिदानाची ही गाथा डोळे पाणावत असले तरी अभिमानानं त्या वीरांना मुजरा करत पाहावी अशी आहे. त्यामुळे हा अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी नक्की जा आणि जाताना आपल्या पुढच्या पिढीला म्हणजेच लहानग्यांना घेऊन जायला विसरु नका. आपला हा वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हवा.

या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स.