मध्य आशियातील किर्गिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission, NMC) धोक्याचा इशारा दिला आहे. या देशातील काही नवी विद्यापीठे, कॉलेजे विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचा इशारा आयोगाने दिला आहे.
किर्गिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात अॅव्हीसेन्ना विद्यापीठ, अॅडम विद्यापीठ, रॉयल मेट्रो, इंटल मेडिकल विद्यापीठ, सलिम्बेकोव्ह विद्यापीठ, एबीसी अशा विविध विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये भारतातील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. ही बाब भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने समोर आणली आहे. या सर्व विद्यापीठांमध्ये किर्गिस्तानातील एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाने आयोगाला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. यानुसार आयोगाने या विद्यार्थ्यांना या विद्यापीठांमध्ये विविध समस्या येऊ शकतील, असे सूचित केले आहे.
यामुळे या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक नियमांचे वाचन करावे, असे आयोगाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर आयोगाने परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी २०२१मध्ये जी नियमावली जाहीर केली आहे तिचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि तेथे प्रवेश घेण्यापूर्वी पुनर्विचार करावा, असेही या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.