राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. यावेळी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच निवडक निमंत्रित उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनातील विरोधकांच्या उपस्थितीवरुन टोला लगावला.
“मला आज नुतनीकरण केलेल्या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री म्हणून इथे आल्याचा वैयक्तिक आनंद होत आहे. राजभवन, दरबार हॉल आमच्यासाठी नवीन नाही. विरोधीपक्षात असताना वर्षात एखाद दुसऱ्या वेळी शिष्टमंडळ घेऊन राजभवनात येत होतो. अगदी रोज काही येत नव्हतो पण एखाद दुसऱ्यावेळेला येत होतो. राज्यपालांना भेटून त्यांना आमच्या व्यथा सांगायचो. आजही आवश्यकता असते तेव्हा आमचा संवाद सुरुच असतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
“या वास्तूने अनेक घटना पाहिलेल्या आहेत. याच वास्तूतून ३० एप्रिल १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण केले होते त्याचा मला विशेष अभिमान वाटतो. या वास्तूच्या नुतनीकरणात ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. कदाचित आपले राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन असेल. इथे राजकीय हवा कशीही असू द्या पण इथे हवा थंडच असते. इथे साप आणि मोरही आढळून येतात. अशी वास्तू शोधूनही सापडणार नाही,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आपण आधुनिकीकरणाच्या नावाखाली जुने तोडून मॉर्डन अशी वास्तू उभी करतो. पण त्याचवेळी आपली संस्कृतीसुद्धा जपणे आव्हानात्मक असते. या नव्या वास्तूमध्ये आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
The post “विरोधीपक्षात असताना आम्ही रोज राजभवनावर येत नव्हतो”; नव्या दरबार हॉलच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचा टोला appeared first on Loksatta.