ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या अनेक प्रश्नांवरती गेल्या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलने- मोर्चे घेण्यात आले.

मुंबई: इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणावरून पक्षापासून दुरावलेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी राज्यस्तरीय ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकाराने या समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये २५ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये समाजाची राज्यस्तरीय परिषद होणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या अनेक प्रश्नांवरती गेल्या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलने- मोर्चे घेण्यात आले. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा ओबीसींचे सामाजिक संघटन असावे, असा आग्रह होत आहे. त्यातूनच राज्यस्तरीय व्हीजेएनटी बहुजन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात सध्या ५० लाख संघटनेचे सदस्य आहेत. या समाजाला आपले सांविधानिक हक्क व अधिकार, शिक्षण, नोकऱ्या आणि पंचायत राजमधील आरक्षण या संदर्भात घटनात्मक हक्काविषयी जागृत करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट या संघटनेचे असणार आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर ओबीसींना एकत्र करून जातनिहाय जनगणना व पंचायत राजमधील २७ टक्के आरक्षणासंदर्भात केंद्र शासनाला घटनादुरुस्ती करून राजकीय आरक्षण मिळविणे ही उद्दिष्टे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.
Web Title: New organization to bring obc community together akp