डबे, विद्युत यंत्रणेला रेल्वे प्रशासनाची मंजुरी
नवी मुंबई : नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या सर्व डबे आणि विद्युत यंत्रणेला भारतीय रेल्वे मंडळाकडून अखेर शुक्रवारी मंजुरी मिळाली. बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर लांबीच्या मार्गावर नवी मुंबई मेट्रो लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून आता केवळ स्थापत्य कामांचे पर्यवेक्षण शिल्लक आहे.
काही दिवसापूर्वी बेलापूर ते पेंदार या पहिल्या मेट्रो मार्गावरील पाच किलोमीटर अंतराची मेट्रो रेल्वे सुरक्षा पाहणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी या मार्गाची ऑसिलेशन, विद्युत, अत्यावश्यक ब्रेक यांच्या चाचण्या झाल्या असून र्सिच डिझाइन अॅण्ड स्टर्डड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) या रेल्वे संस्थेकडून प्रमाणपत्रही मिळाली आहेत.
नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षम करण्यासाठी सिडकोने चार मेट्रो मार्गाचा आराखडा तयार केला आहे. त्यातील बेलापूर ते पेंदार हा ११ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम मे २०१२ मध्ये सुरू करण्यात आले आहे. सात वर्षे हा प्रकल्प रखडल्याने सिडकोने या प्रकल्पाला गती देण्यासाठी (अभियांत्रिकी साहाय्य) महामेट्रोची नियुक्ती केली आहे. त्यानंतर या प्रकल्पाने वेग घेतला असून गेल्या वर्षी आरडीएसओकडून खारघर ते तळोजा या पाच किलोमीटर अंतराची ऑसिलेशन चाचणी घेण्यात आली.
मेट्रो सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या या चाचण्या यशस्वी पार पडल्या असून त्याची प्रमाणपत्र मिळालेली आहेत. या चाचण्यांनंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या सुरक्षेविषयक चाचण्या मागील महिन्यात घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर मेट्रोसाठी लागणारे सर्व डब्बे, विद्युत यंत्रणा विशेषत सिग्नल यांना रेल्वे मंडळाकडून ११ फेब्रुवारी रोजी हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ या मार्गावरील स्थापत्य कामांची पाहणी झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा व रेल्वे प्रशासनाकडून मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.
नवी मुंबई मेट्रोच्या स्थापत्य कामाची पाहणी पूर्ण झाल्यानंतर मेट्रोच्या पहिल्या टप्यातील पहिली मार्गिका सुरू करण्यासाठी तयार होणार आहे. मेट्रो सुरू करण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या आता अंतिम टप्यात असल्याने ही सेवा लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. – डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
The post नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाला वेग; डबे, विद्युत यंत्रणेला रेल्वे प्रशासनाची मंजुरी appeared first on Loksatta.