‘मोदींचा लक्षद्वीप दौरा ‘सोची समझी’ रणनीती’, ठाकरे गटाला शंका; म्हणाले, ‘2024 च्या राजकीय..’

India vs Maldives Uddhav Thackeray Group Stand: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीवरुन थेट अंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण तापलं आहे. मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने मालदीववर बहिष्कार टाकण्याची भूमिका भारतीयांनी घेतल्याने मालदीवकडून माफीनाम्यांची मालिकाच सुरु झाली आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीप दौऱ्यामागे राजकारण असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

पंतप्रधानांवर खालच्या भाषेत टीका शोभत नाही

“भारताच्या राजकारणात सध्या ‘जोकरगिरी’ नक्कीच सुरू आहे. लोकशाहीच्या छाताडावर नाचत जे विदूषकी प्रकार सुरू आहेत ते निंदनीय आहेत. मोदी-शहांचे राज्य देशावर आणि काही राज्यांत आल्यापासून राजकारणाची पातळी व भाषा खाली घसरली आहे. मालदीवच्या 3 मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका केली. ‘जोकर’ अशा शब्दात संभावना करताच भारतीयांनाही धक्का बसला. मालदीवच्या सरकारने त्या तीनही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. अर्थात ते काहीही असले तरी भारताच्या पंतप्रधानांवर खालच्या भाषेत टीका करणे हे विदेशातील मंत्र्यांना शोभत नाही,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

मॉडेलला लाजवेल अशा अप्रतिम ‘पोझेस’ मोदींनी दिल्या

ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींचा फोटो सेन्स चांगला असल्याची खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. “पंतप्रधान मोदी हे एक आत्ममग्न नेते आहेत हे मान्य. स्वतःचे फोटो, स्वतःचीच प्रसिद्धी, स्वतःचीच टिमकी हे त्यांचे धोरण आहे. मोदी व फोटो यांच्यामध्ये जो कोणी येईल त्यास ते स्वतः हात धरून बाजूला करतात हे सगळ्यांनीच पाहिले. मोदी हे उत्तम अभिनेते आहेत व त्यांचा ‘फोटोसेन्स’ चांगला आहे. देवळात एखाद्या पूजेसाठी, आरतीसाठी ते गेले तरी त्यांची नजर भगवंताच्या मूर्तीकडे नसते तर कॅमेऱ्याच्या ‘अँगल’कडे असते. मोदी हे कधी गळ्यात कॅमेरा लटकवून फोटोग्राफी करतात तर कधी ते स्वतःच्या मोबाईलवरून ‘सेल्फी’ घेताना दिसतात. जम्मू-कश्मीरमध्ये ‘पुलवामा’ कांड घडून 40 जवानांचे बलिदान झाले त्या वेळी मोदी हे जिम कॉर्बेटच्या जंगलात एका शूटिंगमध्ये मग्न होते. याबाबत त्यांच्यावर टीका झाली तरी ते पर्वा करीत नाहीत व कॅमेरा-फोकस-लाईट्स-अॅक्शनच्या सान्निध्यात राहतात. ते केदारनाथला जातात व तेथील गुहेत तपाला बसतात. पण कॅमेरे त्यांच्या तपमूर्तीचे लाइव्ह चित्रण करीत असतानाही मोदी यांचा तपोभंग होत नाही हे महत्त्वाचे. सांगायचे तात्पर्य असे की, मोदी हे लक्षद्वीप बेटावर गेले. तेथील निळ्याशार समुद्रावर ते ‘आत्ममग्न’ म्हणजे तपस्वी अवस्थेत ध्यान करीत आहेत, एकटेच फिरत आहेत, चिंतन-मनन करीत आहेत, अशी छायाचित्रे अनेक ‘मुद्रां’मध्ये प्रसिद्ध झाली. काही व्हिडीओदेखील प्रसिद्ध झाले. एखाद्या व्यावसायिक मॉडेलला लाजवेल अशा अप्रतिम ‘पोझेस’ मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानिमित्त प्रसिद्ध झाल्या व त्यावर देशभरातील भाजप भक्तांनी प्रतिक्रिया दिल्या,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा :  Paytm कंपनीची जबरदस्त ऑफर! 4 रुपयात मिळवा 100 रुपयाचा कॅशबॅक, कसं ते जाणून घ्या

लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार

“लक्षद्वीपचा शोध नव्यानेच लागला व मोदी हेच त्या शोधाचे जनक आहेत, असा शोध त्यातील काही अंधभक्तांनी लावला. लक्षद्वीप हा अनेक समुद्री बेटांचा समूह असून तेथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद फैजल हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाला येथे फारसे स्थान नाही. मोदी यांनी येथे पाय ठेवताच लक्षद्वीपच्या विकासासाठी साधारण एक हजार कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ जाहीर केले. ही तेथील एका लोकसभा जागेची तयारी म्हणावी लागेल. मोदी आले. त्यांनी समुद्रावर चिंतन केले. हजार कोटी रुपये दिले. लक्षद्वीपशी आपले जुने नातेसंबंध असल्याचे सांगितले नाही इतकेच. पण त्यानंतर भगत मंडळी चेकाळली व त्यांनी भारताचे पर्यटन धोरण जाहीर केले. मालदीवला जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा लक्षद्वीपला जाणे चांगले आहे, असे त्या भगतगणांनी सोशल मीडियावर सांगितले. त्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी टीका करून भारताची खिल्ली उडवली. मंत्री मरियम शिउना यांनी तर भारताच्या पंतप्रधानांसाठी ‘जोकर’ हा अपशब्द वापरून मोदी हे इस्रायलचे समर्थक वगैरे असल्याचे म्हटले. भारत आमच्याशी स्पर्धा करू शकत नसल्याचे जाहीद रमीझ या दुसऱ्या मंत्र्याने सांगितले. त्यावर भारतात संताप व्यक्त करताच मालदीवच्या त्या 3 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. या प्रसंगानंतर ‘बायकॉट मालदीव’ अशी एक मोहीम सोशल मीडियावर सुरू केली गेली व त्यामुळे असंख्य पर्यटकांनी मालदीवचे आपले हॉटेल, विमानाचे बुकिंग रद्द केल्याचे समजले. मालदीवमध्ये भारतातून सर्वाधिक पर्यटक जातात व मालदीवमधील अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. मालदीव हा समुद्री बेटांचा भव्य समूह असला तरी देश पूर्णपणे समुद्रात आहे व जमीन अशी नाहीच. त्यामुळे तेथे कोणतेच उत्पादन होत नाही. मालदीव हे इस्लामिक रिपब्लिक आहे व त्या देशाची लोकसंख्या पाच लाख इतकीही नाही. राजकीय संकट काळात भारताने त्यांना वारंवार मदत केली आहे, पण अलीकडे मालदीवमध्ये चीनधार्जिण्या राजकारणाने जोर पकडला आहे,” असं उल्लेख लेखात आहे.

हेही वाचा :  Tunnel Rescue : खचलेल्या 41 भारतीयांसाठी देवदूत ठरणारे स्पेशल एक्सपर्ट Arnold Dix आहेत तरी कोण?

‘सोची समझी’ राजकीय रणनीती

“चीनच्या कर्जाखाली हा देश वाकला आहे व त्यामुळेच हे असे भारतविरोधी फूत्कार सुरू झाले आहेत. मालदीवच्या सागरात चिनी युद्धनौकांचे नांगर पडले आहेत व नेपाळप्रमाणेच चीनने मालदीवला आपल्या पंखाखाली घेऊन दाबण्याचे धोरण अवलंबले आहे. देश लहान असला तरी भारताच्या समुद्र सीमा रक्षणासाठी मालदीवचे महत्त्व मोलाचे आहे. लक्षद्वीपच्या निमित्ताने मोदी भक्तांनी मालदीवला डिवचले. मालदीवच्या निमित्ताने लक्षद्वीपच्या एका खासदारकीच्या जागेवर टिचकी मारली. आता म्हणे देशातील अनेक सेलिब्रिटीजकडून ‘चलो लक्षद्वीप’चा नारा देण्यात आला. सलमान खानपासून जॉन अब्राहमपर्यंत अनेक नट मंडळींनी आता ‘चलो लक्षद्वीप’चा आग्रह धरला. यापुढे लक्षद्वीपच्या समुद्रतटांवर अनेक देशभक्त नटनट्यांचा वावर वाढू लागेल. पर्यटनास चालना मिळेल व हे सर्व मोदींमुळेच घडले, असा डंका पिटून तेथील एकमेव लोकसभा जागेवर प्रचार केला जाईल. मोदी यांचा लक्षद्वीप दौरा हा ‘सोची समझी’ राजकीय रणनीतीचाच भाग असावा. 2024 च्या राजकीय लढाईत एक-एक जागेचे महत्त्व आहे व ‘अबकी बार चारसे पार’चे उद्दिष्ट गाठणे सोपे नाही, किंबहुना कठीणच आहे. म्हणून लक्षद्वीपच्या एकमेव जागेसाठी मोदी व त्यांच्या प्रचारकांनी हे समुद्रनाट्य निर्माण केले. अर्थात ते काहीही असले तरी भारतीय पंतप्रधानांना ‘अपशब्द’ वापरून अपमान करणे याचा निषेध व्हायलाच हवा. आम्हीही धिक्कार; धिक्कार करीत आहोत. पंतप्रधानांचा अपमान हा 140 कोटी भारतीयांचा अपमान आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

हेही वाचा :  मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर? दोन्ही ठाकरे एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्या क्षणाला काय...'Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …