झी मराठीवरील ‘मन झालं बाजींद’ या मालिकेचा नुकताच १५० वा भाग प्रसारित झाला होता. सुरुवातीपासूनच या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना खूप भावले आहे. त्यामुळेच ही मालिका दीडशे भागांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करताना दिसली आहे. मालिकेत श्वेता खरात आणि वैभव चव्हाण यांनी साकारलेली कृष्णा आणि रायाची प्रेमकहाणी हळूहळू रंजक वळणावर आलेली आहे. अनेक संकटांना मात करत रायाने कृष्णाला आपलेसे केले आहे. दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला असतानाच मात्र मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. लवकरच राया आणि कृष्णाच्या संसारात अंतराची पुन्हा एकदा एन्ट्री होत आहे.

रायाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी ही अंतरा गुलीमावशीसोबत कुठले कटकारस्थान रुचणार याची उत्सुकता पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. मालिकेचा दीडशे भागांचा टप्पा पूर्ण पार पडत असतानाच कृष्णाने म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात हिने पहिलीवहिली गाडी घेतल्याचा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेला पाहायला मिळतो आहे. या मालिकेअगोदर श्वेताने राजा राणी ची गं जोडी या मालिकेत सहाय्यक भूमिका निभावली होती. मन झालं बाजींद या मालिकेतून श्वेता मुख्य भूमिकेत दिसली. त्यामुळे यशाची एकएक पायरी चढत असताना पहिल्या चार चाकी वाहन खरेदीचा आनंद तिच्यासाठी द्विगुणित करणारा ठरला आहे. ‘Volkswagen taigun’ ही गाडी श्वेताने नुकतीच खरेदी केली आहे. या गाडीची किंमत ११ लाख ते १७ लाख इतकी असल्याचे दिसून येते. श्वेता आपल्या कुटुंबासोबत ही गाडी खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी हा आनंदाचा क्षण तिने कॅमेऱ्यात कैद केलेला पाहायला मिळाला. तिच्या या यशाबद्दल तिच्या कुटुंबियांना देखील खूप आनंद आणि कौतुक आहे.

अभिनयासोबतच श्वेता खरात ही उत्कृष्ट डान्सर देखील आहे. नृत्याचे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतील. लागीर झालं जी मालिकेतील अभिनेता नितीश चव्हाण आणि श्वेता खरात या दोघांची खूप चांगली मैत्री आहे. या दोघांचे डान्सचे एकत्रित असलेल्या व्हिडिओजना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवलेली पाहायला मिळाली आहे. लागीर झालं जी या मालिकेच्या सेटवर श्वेता दाखल झाली होती तेव्हा ती नितीशच्या प्रेमात आहे असे बोलले जात होते. मात्र त्यांनी आपल्या नात्यावर खुलासा करण्याचे टाळले होते. एक सहाय्यक अभिनेत्री ते मुख्य नायिका असा श्वेता खरातच कलासृष्टीतला प्रवास उल्लेखनीयच म्हणावा लागेल. स्वकमाईमधून आयुष्यात घेतलेली पहिली वहिली गाडी असे म्हणत तिने गाडी खरेदी केल्याची बातमी शेअर केली आहे. श्वेताला तिच्या अशाच यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…