९० च्या दशकात ‘महाभारत’ हि दूरदर्शनची मालिका खूप गाजली होती. या मालिकेत भीमचे पात्र अभिनेते ‘प्रवीण कुमार सोबती’ यांनी साकारले होते. गेल्या काही वर्षांपासून प्रवीण कुमार सोबती आजारपणामुळे त्रस्त झाले होते. या आजारपणात गोळ्या औषधे घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. आजारपणामुळे काम करता येईना याचमुळे उत्पन्नाचे साधनच कुठले त्यांच्याकडे नव्हते. यासाठी त्यांनी सरकारकडे पेन्शन मिळावी म्हणून तगादा लावला होता मात्र त्यावर कुठलाच निर्णय घेतला गेला नव्हता . अशातच आता त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी प्रविणकुमार सोबती यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. या बातमीने कलासृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रविणकुमार सोबती हे आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील होते. प्रविणकुमार सोबती यांनी साकारलेली महाभारत मालिकेतली भीमची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती. बी आर चोप्रा भीमच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेत असल्याचे प्रवीण कुमार यांना समजले होते. तेव्हा ऑडिशन देण्यासाठी ते तिथे पोहोचताच भरभक्कम शरीरयष्टी पाहून त्यांचे सिलेक्शन करण्यात आले. भीमची भूमिका गाजवल्यानंतर प्रवीण कुमार सोबती यांनी अनेक हिंदी चित्रपटातून काम केले होते. प्रविणकुमार सोबती यांनी एशियायी थाळी फेक स्पर्धेत १९६६ आणि १९७० साली सुवर्ण पदक पटकावले होते. तर १९७४ साली रजतपदक मिळवले तर १९६६ साली हॅमर थ्रो स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. एवढे असूनही आज सरकार त्यांच्याकडे लक्ष्य देत नाही अशी एक खंत त्यांनी गेल्या महिन्याभरापूर्वी व्यक्त केली होती. वयाच्या ७५ व्या वर्षी प्रवीण कुमार सोबती हे आर्थिक संकटाला तोंड देत होते. यातून मला सरकारने मदत मिळवून द्यावी अशी विनंती त्यांनी केली होती. प्रविणकुमार सोबती यांना एक मुलगी आहे तिचे लग्न झाले आहे. प्रविणकुमार सोबती त्यांच्या पत्नीसोबत राहत होते. मात्र मणक्याच्या त्रासामुळे आणि वयोपरत्वे त्यांना एकाच जागेवर बसून राहावे लागत होते. शिवाय शरीर साथ देत नसल्याने आणि पोटाच्या तक्रारी यामुळे देखील त्यांचे खूपच हाल होत होते. त्यांच्या पत्नी विना याच त्यांची सर्व काळजी घेत होत्या. भीमची भूमिका केली म्हणून मला सर्वजण ओळखत होते मात्र गेल्या दोन वर्षांच्या काळात माझी कोणीच विचारपूस देखील केली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

मिडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की पंजाबमध्ये जेवढ्या सत्ता आल्या त्यातील कोणीच मला पेन्शन मिळावी म्हणून मदत केली नाही. मी भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा खेळाडू होतो आणि मी एकमेव एथलीट प्लेअर होतो ज्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये रिप्रेझेंट केलं होतं. तरी देखील मला हा वाईट अनुभव मिळाला असे त्यांनी मत व्यक्त केले होते. प्रविणकुमार सोबती यांनी बीएसएफ मध्ये डेप्युटी कमांडेंट म्हणून काम केले होते. त्यामुळे बीएसएफ कडून त्यांना पेन्शन मिळत होती मात्र ही मदत खूपच तुटपुंजी असल्याचे त्यांचे म्हणणे होते. माझा आर्थिक खर्च यापेक्षा जास्त असल्याने सरकारने माझी पेन्शन सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली होती. वयोपरत्वे बरीचशा कलाकारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे यात प्रविणकुमार सोबती यांना देखील हा अनुभव चुकलेला नाही . प्रविणकुमार सोबती यांनी साकारलेला भीम प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील त्यांना आमच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली…