जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नावर पुढील आठवड्यात मंत्रालयात संयुक्त बैठ्क घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिली. जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंबंधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची रविवारी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंबंधी मराठी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने आपली भूमिका मांडली. “जयप्रभा स्टुडिओ हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या जागेबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास प्रसंगी आत्मदहन करावे लागेल,” अशी तीव्र प्रतिक्रिया शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांच्याशी बोलताना दिली. जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे आणि हा स्टुडीओ कलाकारांसाठी खुला झाला पाहिजे यासाठी जयप्रभा स्टुडिओ समोर गेली सात दिवस आंदोलन सुरू आहे. याकडे शिष्टमंडळाने पाटील यांचे लक्ष वेधले.
जयप्रभाची जागा चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याबरोबरच चित्रपट महामंडळ किंवा कोल्हापूर चित्रनगरीकडे वर्ग करा, अशी मागणी करण्यात येत आहे. यावर अजूनही प्रशासकीय पातळीवर निर्णय झाला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. याबाबत बोलताना मंत्री सतेज पाटील यांनी, “जयप्रभाच्या प्रश्नावर आपणही आग्रही आहोत. त्यामुळे यातून लवकरच मार्ग काढण्यासाठी पुढील आठवड्यात चित्रपट महामंडळाचे सदस्य, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सोबत संयुक्त बैठक घेऊन यातून मार्ग काढू,” असे म्हटले.
यावेळी शिष्टमंडळामध्ये महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, आनंद काळे, अमर मोरे, रणजीत जाधव, मिलिंद आष्टेकर, बाबा पार्टे आदी होते.
The post “जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नावर आम्हीसुद्धा आग्रही”; मंत्रालयात संयुक्त बैठक घेणार असल्याची सतेज पाटील यांची माहिती appeared first on Loksatta.