विद्युत प्रवाहाची केबल तुटून गोठ्यावर पडल्याने ३२ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमधल्या केतूर २ येथे घडली आहे. शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. केतूर २ येथील येथील तात्याराम कोकणे यांच्या शेळ्या या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडल्या आहेत.
त्या गोठ्यावरुन महावितरण कंपनीच्या खांबावरुन घरगुती वीज जोडणी दिलेली केबल जात आहे. पहाटे ही केबल तुटून गोठ्यावर पडली. त्याचा करंट या शेळ्यांना लागला. यामुळे ३२ शेळ्या जागीच मृत्यू झाल्या. घटनास्थळी गाव कामगार तलाठी माने यांनी भेट दिली आहे.केतुर पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सोमनाथ खरात यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. नुकसानीची सरकारकडून भरपाई मिळावी अशी मागणी कोकणे कुटुंबियांनी केली आहे.
याबद्दल तात्याराम कोकणे यांचे चिरंजीव बापूसाहेब कोकणे यांनी आपलं साडेतीन ते चार लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. शासनाकडून मदत मिळावी अशी आपली अपेक्षा असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. कोकणे यांनी सांगितलं, आमच्या ४५ शेळ्या मेंढ्या होत्या. त्यापैकी करंट लागून ३२ शेळ्यांचा मृत्यू झाला. नदीचं पाणी वाढल्यानं आम्ही शेळ्यामेंढ्या चरायला आणल्या होत्या. सकाळी ६ च्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. तलाठी आणि वैद्यकीय अधिकारी पाहणी करून, पंचनामा करून गेले आहेत. शवविच्छेदनही करण्यात आलं आहे. आता शासनाकडून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.
The post हृदयद्रावक! विजेची वायर तुटून गोठ्यावर पडली; करंट लागून ३२ शेळ्या-मेढ्यांचा मृत्यू appeared first on Loksatta.