२२ फेब्रुवारीच्या चाचणीत सहभागासाठी मिळणार चारच दिवस
नागपूर : करोना व आरोग्याच्या अचानक उद्भवलेल्या समस्यांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची शारीरिक चाचणी देऊ न शकलेल्या उमेदवारांची २२ व २३ फेब्रुवारीला पुणे पुन्हा चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, नागपूर आणि अमरावती विभागातील उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरूच असून येथील करोना झालेल्या किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या उमेदवारांना पुणे येथे होणाऱ्या २२ फेब्रुवारीच्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ चार ते पाच दिवसांचा अवधी मिळणार असल्याने हा उमेदवारांवर अन्याय असल्याचा आरोप होत आहे.
‘एमपीएससी’च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उमेदवार तब्बल अडीच वर्षांपासून तयारी करीत आहेत. करोना, आरक्षण अशा विविध समस्यांमध्ये रखडलेल्या भरती प्रक्रियेला अखेर गती आली असून शेवटच्या टप्प्यातील शारीरिक चाचणी नागपूर आणि अमरावती विभागामध्ये घेतली जात आहे. नागपूरमध्ये १४ आणि १५ फेब्रुवारीला शारीरिक चाचणी झाली असून १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत अमरावती विभागामध्ये होणार आहे. मात्र, या दोन्ही विभागामधील अनेक उमेदवार हे करोना व अन्य आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे शारीरिक चाचणीमध्ये सहभागी होऊ शकले नाही.
वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या या उमेदवारांना पुणे येथे होणाऱ्या शारीरिक चाचणीमध्ये सहभागी होता येणार आहे. मात्र, आजारातून बरे झाल्याच्या चार ते पाच दिवसांतच या उमदेवारांना आता शारीरिक चाचणीला सामोरे जावे लागणार असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. राज्याच्या इतर भागातील शारीरिक चाचणी ही अनेक दिवसांआधी झाली आहे. त्यामुळे या भागातील उमेदवारांना सरावासाठीही अधिकचे दिवस मिळाले आहेत. असे असताना नागपूर आणि अमरावती विभागातील आताच आजारातून बाहेर आलेल्या उमेदवारांवर अन्याय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संधी गमावण्याची भीती
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीसाठी उमेदवार अडीच वर्षांपासून तयारी करीत आहेत. यातील अनेकांनी वयाची मर्यादाही ओलांडली आहे. त्यामुळे केवळ आरोग्याच्या समस्येमुळे ही संधी गमावल्यास भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय अन्य पदांची भरती प्रक्रियाही बंद आहे. त्यामुळे एमपीएससीने वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
The post आरोग्य समस्येमुळे शारीरिक चाचणीपासून वंचित उमेदवारांवर अन्याय! appeared first on Loksatta.