राज्यात बहुतांश ठिकाणी शाळा, महाविद्यालये सुरू झाली असली तरी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा, कार्यशाळा ऑनलाइनच सुरू होत्या. मात्र, आता करोनाचा प्रादुर्भाव घटू लागल्याने येत्या एक मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि कार्यशाळा ऑफलाइन सुरू करण्यात येणार आहे, याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्णय घेतला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ऑफलाइन शिक्षणाबाबत माहिती देणारे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, करोना विषाणूंचा प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नाही. अनेक ठिकाणी तो घटला आहे. त्यामुळे तेथे शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने यापूर्वीच घेतला होता. मात्र, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांशी निगडीत कोणताही निर्णय न झाल्याने या विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षणापासून मुकावे लागले होते. परंतु, आता परिस्थितीत सुधारणा झाल्याने एक मार्चपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून अंतिम निर्णय घेण्याच्या सूचना प्राधिकरणाला दिलेल्या आहेत.
स्थानिक पातळीवर निर्णय
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा, कार्यशाळा सुरू करण्याबाबत विभागातर्फे दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांना सूचना केल्या आहेत. स्थानिक परिस्थितीचा विचार करून महापालिका क्षेत्रात आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या स्थानिक प्राधिकाऱ्यांच्या निर्देशनुसार विभागांतर्गत दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा सुरू करण्याचे सुचविले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
दोन वर्षे शाळा बंद असल्याने दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. करोनाची रुग्णसंख्या घटल्याने शाळा येत्या १ मार्चला सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टळणार आहे. कार्यशाळाही सुरू होत असल्याने दिव्यांगाना कौशल्यगुण प्राप्त करण्यासाठी मदत होईल अशी प्रतिक्रिया नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी दिली आहे.
शाळा तात्काळ सुरु करणे गरजेचे
देशभरातील शाळेत शिकणारी मुले आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील करोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना अनेक राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. तरी काही राज्यांनी अजून ऑनलाइन शिक्षणाला महत्व दिल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना शाळा सुरु करण्यासंदर्भातील महत्वाचे निर्देश दिले आहेत.
राज्यात मुलांच्या शाळा तातडीने सुरू करण्यात याव्यात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी (State wise school reopening)शाळा उघडणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे राज्यांनी या कामात कोणतीही हलगर्जीपणा दाखवू नये आणि तातडीने शाळा सुरू करण्याची व्यवस्था करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.