राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग कोर्टाने हा निर्णय़ दिला असून जामीनही मंजूर कऱण्यात आला आहे. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
मोठी बातमी! राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
दरम्यान बच्चू कडू यांनी कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून चुकीच्या निर्णयाचे स्वागत करतो असं म्हटलं आहे. “२०१४ विधानसभा निवडणुकीसाठी २०१४ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतलं होतं. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता. मात्र या प्रकरणात कोर्टाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने निकाल दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.