– हृषिकेश देशपांडे
विधानसभा निवडणुकीअंतर्गत गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. अकरा लाखांवर मतदार तर विधानसभेच्या ४० जागा. त्यामुळे छोटे मतदारसंघ, त्यांचा अंदाज वर्तवणेही कठीण. उत्तर गोव्यात १९ तर दक्षिणमध्ये २१ मतदारसंघ येतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे बहुमताचा २१ हा आकडा गाठणे कोणत्याही पक्षासाठी कठीणच दिसत आहे. राज्यात सत्ताधारी भाजप विरोधात काँग्रेस अशी प्रामुख्याने लढत आहे. याखेरीज आम आदमी पक्ष तसेच तृणमूल काँग्रेस-महाष्ट्रवादी गोमांतक पक्ष यांची आघाडी तसेच इतरही स्थानिक पक्ष रिंगणात आहेत.
भाजपची कोंडी
राज्यात गेली दहा वर्षे भाजप सत्तेत आहे. त्यामुळे साहजिकच सत्ताविरोधी नाराजीचा सामना यावेळी त्यांना करावा लागत आहे. गेल्या वेळी अवघ्या १३ जिंकूनही छोट्या पक्षांना बरोबर घेऊन त्यांनी सत्तेचे गणित जमवले होते. पण यंदा पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक. पर्रिकर यांच्यासारखा तोलामोलाचा नेता भाजपकडे राज्यात नाही. त्यातच पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांनी पणजी मतदारसंघातून बंड केले आहे. राज्यात भाजप सर्व ४० जागांवर यंदा प्रथमच लढत आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची साथ त्यांना नाही. उमेदवारीवरूनही माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासारख्या बड्या नेत्याने भाजपला आव्हान दिले आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर भाजपची सारी भिस्त आहे.
मतविभागणीचे गणित
राज्यात मतदारसंघ लहान आहेत. गेल्या निवडणुकीत ११ जागा या दोन हजारपेक्षा कमी मतांनी जिंकल्या गेल्या होत्या. त्यामुळे बहुरंगी लढतींमध्ये निकालाचे भाकीत वर्तवणे अवघड आहे. गेल्या वेळी आम आदमी पक्षाला सव्वासहा टक्के मते मिळाली होती तर एका मतदारसंघात त्यांचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गेल्या पाच वर्षांत त्यांनी तयारी केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी ४५ वर्षीय अमित पालेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. पालेकर हे राज्यातील प्रभावी अशा भंडारी समाजातील आहेत. स्थानिक निवडणुकीत आपने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे विधासभेला आपच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांचीही आघाडी रिंगणात आहे.
काँग्रेसकडून नवे चेहरे
गेल्या निवडणुकीत सर्वाधिक १७ जागा मिळूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहिली होती. गेल्या पाच वर्षांत पक्षाच्या १५ आमदारांनी अन्य पक्षात प्रवेश केला. त्यामुळे यंदा ३१ नवे उमेदवार काँग्रेसने दिले आहे. त्यांची गोवा फॉरवर्डशी आघाडी आहे. साष्टी या ख्रिस्तीबहुल तालुक्यातील आठ जागांवर त्यांची भिस्त आहे. येथे त्यांचा सामना प्रामुख्याने तृणमूल काँग्रेस-महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्या आघाडीशी आहे. तृणमूल काँग्रेसने काँग्रेसमधीलच नेते फोडल्याने आघाडीसाठी काँग्रेसने स्वारस्य दाखवले नाही. येथे भाजपचे फारसे अस्तित्व नाही. पक्षाचे आमदारच फुटल्याने काँग्रेसने यंदा उमेदवारांकडून एकनिष्ठतेची शपथच घेतली. गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या ४० पैकी २४ आमदारांनी पक्ष बदलला, त्यावरून विचार वा निष्ठेला दुय्यम स्थान दिले गेले केवळ स्वहीत महत्त्वाचे ठरले हे अधोरेखित झाले.
निकालानंतरच्या समीकरणांची चर्चा
बहुमतासाठी असणारे २१ चे संख्याबळ गाठणे भाजप किंवा काँग्रेससाठी अवघडच दिसत आहे. त्यामुळे अशा स्थितीत छोट्या पक्षांचे तसेच अपक्षांचे महत्त्व निकालानंतर पुन्हा एकदा वाढणार आहे. खाणकाम परवानगी, पर्यटन वाढीला प्रोत्साहन या मुद्द्यांबरोबर राज्यात यंदा इतर लोकानुनय करणाऱ्या आश्वासनांचा सपाटा राजकीय पक्षांनी चालवला होता. अशा स्थितीत गोवेकर १४ फेब्रुवारीला मतदानातून कोणाला कौल देतात याची उत्सुकता आहे.
The post विश्लेषण : गोव्यात बहुमताचा मार्ग खडतर appeared first on Loksatta.