कोणत्याही विद्यापीठाला अंशतः मान्यता दिली जाणार नाही. त्यांना संपूर्ण मान्यता मिळेल. सर्व तांत्रिक अभ्यासक्रमांना पूर्ण मान्यता मिळेल किंवा ते एआयसीटीईकडून मान्यता न घेता अभ्यासक्रम सुरू ठेवू शकतात अशी माहिती एआयसीटीईचे सदस्य सचिव राजीव कुमार (AICTE Member Secretary Rajiv Kumar) यांनी दिली.
निर्णय घेण्यामागचे कारण
राजीव कुमार म्हणाले की, ‘सर्व मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थांना (Accredited technical institutes) तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम चालवण्यासाठी एआयसीटीईकडून मान्यता आवश्यक आहे. मात्र काही केंद्रीय, राज्य आणि खासगी विद्यापीठे ही काही निवडक अभ्यासक्रमांनाच मान्यता घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधितांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे की, तंत्रशिक्षणात नवीन विभाग किंवा कार्यक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठांना पूर्वपरवानगी घेण्याची गरज नाही. पण एआयसीटीईने ठरवून दिलेल्या मानकांची पूर्तता करण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे. यामुळे तांत्रिक शिक्षणासाठी एकात्मिक विकास आणि निश्चित मानकांची खात्री करता येणार असल्याचे राजीव कुमार म्हणाले.
‘ज्या सर्व मान्यताप्राप्त संस्था तांत्रिक शिक्षण कार्यक्रम चालवत आहेत, त्यांना एआयसीटीईची मान्यता आवश्यक आहे. परिषद कधीही विद्यापीठाची तपासणी करू शकते, ज्यामध्ये संस्था एआयसीटीईने घालून दिलेल्या नियम आणि तरतुदींनुसार कार्यरत आहे की नाही’ हे तपासले जाईल असेही ते म्हणाले.