कलाकृतीला भाषेचा उंबरठा नसतो हे म्हणणे खरं करणारे अनेक रिमेक आजवर पडदयावर आले. रिमेकचे प्रयोग मोठ्या पडदयावर होतातच पण आता छोट्या पडदयावरील मालिकाही विविध भाषांमध्ये रिमेक केल्या जात आहेत. मालिकांचे हे सीमोल्लंघन करण्याचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय होत आहे. आता याच ट्रेंडमध्ये मराठमोळी सासूबाई सीमा ओलांडून थेट तामिळमध्ये पोहोचणार आहे. अग्गंबाई सासूबाई या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाने मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर ही मालिका लवकरच तामिळ भाषेत रिमेक होणार आहे. त्यामुळे आसावरी, बबड्या, शुभ्रा, अभिज किचन, कोंबडीच्या, चप्पलचोर ही पात्र तामिळ भाषेतून नव्याने साकारली जाणार आहेत.

या मालिकेत शुभ्राची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेच ही गुडन्यूज शेअर केली आहे. सून पुढाकार घेऊन विधवा सासूबाईचे लग्न करून देते. त्यासाठी नवऱ्याचा विरोध पत्करते अशी वन लाइन स्टोरी असलेल्या अग्गोबाई सासूबाई या मालिकेच्या या हटके कथानकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. शीर्षकगीतापासूनच या मालिकेने टीआरपीचे रेकॉर्ड तोडले. निवेदिता सराफ यांनी आसावरीची फक्त भूमिकाच नव्हे तर पाकातले घारगेही घराघरापर्यंत पोहोचवले. आशुतोष पत्की याने याच मालिकेतून अभिनयाची सुरूवात केली आणि त्याचा बबड्या हा मम्माज बॉय भाव खाऊन गेला. गिरीश ओक यांचा हॅपी गो लकी शेफही कमाल ठरला. तेजश्रीच्या शुभ्रानेही जणू अश्शीच सून हवी हा नवा टॅग आणला. थोडक्यात काय तर अग्ग्ंबाई सासूबाईची भट्टी चांगलीच जमली. मालिका सुरू असतानाही खूप् काही घडामोडी घडल्या. आजोबांची भूमिका करणाऱ्या रवी पटवर्धन यांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी मोहन जोशी आले. मुख्य व्यक्तीरेखा साकारणाऱ्या निवेदिता यांना कोरोना झाला तेव्हा मालिकेत त्यांचे अनसीन किस्से सांगण्याचा वेगळा प्रयोग केला.

पण जेव्हा या मालिकेचा अग्गंबाई सूनबाई सिक्वेल आला तेव्हा मात्र ही नवी कथा प्रेक्षकांना रूचली नाही आणि या मालिकेला गुंडाळावे लागले. आता या मालिकेचा तामिळ भाषेत रिमेक होणार या बातमीने ही मालिका पुन्हा चर्चेत आली आहे. तामिळ भाषेतील मालिकेचे नाव निश्चित झाले आहे मात्र त्यामध्ये कोण कलाकार असतील हे गुलदस्त्याच आहे. तामिळ टीव्हीने या मालिकेच्या रिमेकची तयारी जोरात सुरू केली आहे. सध्या आई कुठे काय करते या मालिकेचा हिंदी रिमेक गाजत आहे. तर सन टीव्हीवर आभाळाची माया ही मालिका तामिळचा मराठी रिमेक आहे. राजा राणीची ग्ं जोडी ही मालिका तेलगू प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या पंक्तीत आता सीमा ओलांडून मराठी सासूसुनेची जोडीही बसणार आहे. मराठी मालिका गाजल्या कि आता विविध भाषांमध्ये त्या प्रदर्शित केल्याजाऊ लागल्या असल्याचे गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे.