अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या पतीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबावर पुन्हा एकदा शोककळा पसरलेली पाहायला मिळते आहे. मयुरी देशमुख हिच्या आज्जीचे नुकतेच निधन झाले आहे. सात मुलांची आई, आम्हा नातवंडांची आज्जी आणि काहीजणांची पणजी असे म्हणत आज्जीसोबतच्या आठवणींना मयुरीने एका भावनिक पोस्टद्वारे उजाळा दिलेला पाहायला मिळाला. साधारण दोन वर्षांपूर्वी मयुरीच्या पतीचे निधन झाले होते. नैराश्याला कंटाळून आशुतोष भाकरेने टोकाचा निर्णय घेत आपले आयुष्य संपवले होते. आशुतोष भाकरे आणि मयुरी यांचे अरेंज मॅरेज होते एका कार्यक्रमात त्या दोघांची भेट घडवून आणली होती.

दोघांनी गप्पा मारल्या मात्र त्यानंतर तो मुलगा म्हणजे आपल्याला पाहायला आलेले स्थळ होते हे तिला घरच्यांकडून समजले. त्यानंतर मयुरीने लग्न करण्यास नकार दिला होता कारण डेंटिस्ट असलेल्या मयुरीला आपल्या करिअरवर लक्ष्य केंद्रीत करायचे होते. मात्र पुन्हा एकदा आशुतोषला भेटण्यासाठी तिच्या घरच्यांनी आग्रह केला आणि या दुसऱ्या भेटीत तिने आशुतोषसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. चार वर्षांच्या सुखी संसारात रमलेली मयुरी आशुतोषच्या निधनाने खचून गेली होती मात्र यातून स्वतःला सावरत इमली या हिंदी मालिकेतून तीने कलासृष्टीत पुनरागमन केले. इमली मालिकेत मयुरीने प्रथमच विरोधी भूमिका साकारलेली पाहायला मिळत आहे. डॉ प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातून मयुरीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते.

त्यानंतर तिने प्लेजंट सरप्राईज या नाटकातून काम केले. खुलता कळी खुलेना या मालिकेतून मयुरी छोट्या पडद्यावर झळकली. या मालिकेत तिने मानसी देशपांडे ही व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेमुळे मयुरी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती आणि तिला प्ररक्षकांकडून लोकप्रियता देखील मिळू लागली . तिसरे बादशाह हम, ३१ दिवस, ग्रे, लग्न कल्लोळ अशा नाटक आणि चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. इमली या हिंदी मालिकेमुळे मयुरीला हिंदी सृष्टीत देखील चांगली ओळख मिळाली आहे. या मालिकेचे बरेचसे चाहते मयुरीच्या विरोधी भूमिकेवर रोष व्यक्त करताना दिसतात हीच तिच्या सजग अभिनयाची खरी पावती म्हणावी लागेल.