२८ बँकांची २२ हजार ८४१ कोटींची फसवणूक केल्याचा एबीजी शिपयार्ड विरोधात आरोप आहे
मेहुल चोक्सी, नीरव मोदी या घोटाळेबाजांनी केलेल्या बँकांच्या फसवणुकीपेक्षा किती तरी जास्त रक्कम ‘एबीजी शिपयार्ड’ने लाटली असल्याचे उघड झाले आहे. कंपनीच्या कार्यालयांवर ‘सीबीआय’ने छापे टाकले असून २८ बँकांची २२ हजार ८४१ कोटींची फसवणूक केल्याचा कंपनीचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या प्रकरणी आता संचालक ऋषी अग्रवाल आणि अन्य आठ जणांविरोधात ‘लुकआउट नोटीस’ देखील जारी करण्यात आली आहे.
या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीबीआयने आरोपींविरूद्ध ‘लुकआउट नोटीस’ (एलओसी) आधीच जारी केलेली आहे. तसेच, आरोपी भारतात असल्याचे सांगण्यात आले असून, या प्रकरणातील आरोपींना देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच, या एबीजी शिपयार्डच्या संचालकांसह या प्रकरणातील आरोपी असलेल्यांपैकी कोणी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना देखील सर्व सीमा अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
बँकांना २२,८४२ कोटींचा चुना लावणाऱ्या एबीजी शिपयार्डविरोधात गुन्हा दाखल!
तर, देशातील सर्वात मोठय़ा घोटाळय़ांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘एबीजी शिपयार्ड’ या कंपनीचे कर्ज खाते काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात थकीत झाले होते व कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. या कंपनीने केलेली फसवणूक शोधण्यात बँकांना तुलनेत कमी काळात यश आले, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केलेले आहे.
इतक्या मोठय़ा फसवणुकीचा अंदाज आल्यानंतर त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी बँकांना किमान ५२ ते ५६ महिन्यांचा कालावधी लागतो. पण, या घोटाळय़ातील आरोपींचा गुन्हा उघड करण्यास बँकांना तुलनेत कमी काळ लागला असून त्याचे श्रेय बँकांना दिले पाहिजे, असे सीतारामन म्हणाल्या.
काय आहे एबीजी शिपयार्ड? –
एबीजी शिपयार्ड ही कंपनी मोठी जहाजं बनवणे आणि ती दुरुस्त करण्याच्या व्यवसायात आहे. या कंपनीचं मुख्यालय केंद्र गुजरातच्या दहेज आणि सुरतमध्ये असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेड (ABGSL) या कंपनीचे मुख्य संचालक ऋषी अग्रवाल आहेत. सुरतमधील कंपनीच्या शिपयार्डमध्ये तब्बल १८ हजार डेड वेट टनेज क्षमतेची जहाजं बांधण्याची क्षमता आहे. तर दुसरीकडे दहेजमधील शिपयार्डमध्ये १ लाख २० हजार डेड वेट टनेज (DWT) ची जहाजं बांधण्याची क्षमता आहे.